गजानन गव्हाणे पाटील
गणेशो उत्सवानिमित्त कोरेगांव भीमा येथे प्रोग्रेस आर्ट क्लासेस यांच्या माध्यमातुन ” बाप्पा माझा ” या उपक्रमाच्या अंटर्गत गणपती बाप्पा मूर्ती रंगविणे आणि सजवणे स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये विविध शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

सुट्टीच्या दिवशी मोबाईल आणि टीव्हीसमोर तासानतास बसणाऱ्या मुलांनी मात्र सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणपती बाप्पाची मूर्ती रंगवण्यामध्ये मंत्रमुग्ध झाले होते. लहान मोठ्या 30 मुलांमुलींनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले कलागुण सादर केले. मुलांनी गणपती बाप्पा च्या रंगवलेल्या व सजवलेल्या मूर्तीचे परीक्षण सूर्यवंशी व मदन हराळ पाटील यांनी केले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक भावना सचिन घावटे, द्वितीय क्रमांक पलक राघवेंद्र पटेल तर तृतीय क्रमांक जान्हवी कैलास ठाकरे हिने पटकाविला. स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर प्रथम तीन क्रमांकांना चषक आणि प्रमाणपत्रासहित अनुक्रमे १००० रुपये, ७५० रुपये आणि ५०० रुपये रोख पारितोषिक देण्यात आले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मदन पाटील यांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुलांसाठी घेतलेल्या सदर उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आणि संयोजकांना विशेष धन्यवाद दिले.

प्रोग्रेस क्लासेस चे कलाशिक्षक आशिष वाघमारे, सत्यम हंबीर, श्रीमंत प्रताळे, मंगेश मोरे आणि मारुती दरेकर यांनी नियोजन केले होते. उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे आभार सत्यम हंबीर यांनी मानले.





