गजानन गव्हाणे पाटील
पीएमपी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची पाकीटमारी करणार्यास पकडत असताना त्याने मारहाण करुन पळून गेला. त्याच्या साथीदार महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.
गोवरी हरिया स्लाट (वय २०, रा. वाघोली) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या बाबत भिमराव श्रावण वाघमारे (वय २७, रा. केसनंद ) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार केसनंद फाटा येथे रविवारी (दि.३) सकाळी ११ वाजता घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी मनिषा व सासरे तुळशीराम घाटे हे वाघोली ते पुणे स्टेशन या बसमध्ये चढत होते. त्यावेळी एका चोरट्याने फिर्यादी यांच्या पँटच्या खिशात हात घातल्याचे जाणवले. त्यांनी लगेच त्याचा हात पकडला. यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या महिलेने व त्याने फिर्यादीस जोरात ठोसा मारला. तेव्हा फिर्यादीची पत्नी मध्ये पडली. तिला झटका देऊन खिशातील २ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेऊन दोघे तेथून पळून जात असताना फिर्यादीची पत्नी व किरण अप्पासाहेब यांनी चोरट्यासोबत असलेल्या महिलेला पकडले. चोरटा पळून गेला.
लोणीकंद पोलिसांनी महिलेला अटक केली असून अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.





