उंडवडी प्रतिनिधी : युवराज इंदलकर
बारामती डाक विभागा अंतर्गत बारामती तालुक्यातील दंडवाडी आणि नरोळी या गावात दोन स्वतंत्र नवीन शाखा डाकघरांचे उद्घाटन आज दिनांक १ सप्टेंबर रोजी करण्यात आले. दोन शाखा डाकघरामुळे अति दुर्गम भागातील नागरिकांना पोस्टामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सर्व सेवा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा, विविध बचत योजना यांचा लाभ घेता येईल.
बारामती डाक विभाग अधीक्षक दिलीप सर्जेराव यांच्या हस्ते दोन्ही शाखा डाकघरांचे उद्घाटन झाले. दोन्ही डाकघरांचे कामकाज सुपा उपडाकघरांतर्गत चालणार असून दोन्ही शाखा डाकघरांना ४१२२०४ हा पिन कोड राहणार आहे.
सासवड उपविभागाचे इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट मारुती मेढे यांनी पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहिती दिली आणि सामान्य माणसांच्या जीवनातील बचतीचे महत्त्व विशद केले. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून DBT, DLC, विमा, आधार संबंधित व इतर डिजिटल सेवांचे लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचवले जातील असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी दोन्ही गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी MO सुभाष काळे आणि प्रवीण जगताप, ग्रामीण डाक सेवक संघटनेचे पदाधिकारी पितळीया सेठ आणि रामदास भिसे, सुप्याचे भारत जाधव आणि इतर अनेकांचे सहकार्य लाभले.





