गजानन गव्हाणे पाटील
भारत माता कि जय, वंदे मातरम, जय जवान – जय किसान चे नारे देत शिरुर येथील विद्याधाम प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सुमारे ६५० राख्या देशाच्या सीमेवर असणा-या सैनिकांना रक्षाबंधना निमित्त पाठवून सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
शहरातील विद्याधाम प्राथमिक शाळेचे विद्यार्थी दरवर्षी सीमेवर असणा-या भारतीय सैनिकांना रक्षाबंधन निमित्त राख्या पाठवित असतात . विशेष म्हणजे या राख्या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील मुले स्वंत: बनवितात त्याच बरोबर सैनिकांसाठी पत्र ही लिहितात यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांनी ६५० राख्या तयार केल्या.

या राख्या सैनिकांपर्यंत पाठविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरुरचे उपाध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ यांच्या कडे देण्यात आल्या. यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे, बालवाडी विभाग प्रमुख शशिकला सांगळे व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका ज्योती मुळे म्हणाल्या की, सैनिक हे देशावर निस्वार्थीपणे प्रेम करतात सीमेचे रक्षण करुन देशवासियांना सुरक्षित ठेवतात संपुर्ण देश हे आपले कुटुंब मानून सैनिक काम करित असतात सैनिकाचे जीवन हे कठिण असते. सैनिकामधील शिस्त, त्याग, देशभक्ती, निस्वार्थ सेवा हे गुण आपण घेतले पाहीजेत ते रियल हीरो आहेत. ज्या व्यक्ती आपले जगणे सुसह्य करतात त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे असल्याचे मुळे यांनी “आपली लोकशाही” शी बोलताना सांगितले .
विद्याधाम शाळेत मागील अनेक वर्षापासून सीमेवरील जवानांना राख्या व पत्र पाठविण्याचा उपक्रम दरवर्षी घेतले जात असल्याचे मुळे यांनी सांगितले.

तर प्रा. सतीश धुमाळ म्हणाले की विद्याधाम प्राथमिक शाळा दरवर्षी सीमेवरती जवानांना राख्या पाठवितात हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सर्वांच्या जीवनात सैनिकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. देशाचे संरक्षण करीत असताना सैनिकांना प्राणांचेही बलिदान करावे लागते. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्यच असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी सैन्यदलात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन नंदा रावडे यांनी व पत्राचे वाचन रुपाली करंजकर तर आभार भाग्यश्री आसवले यांनी मानले.





