◆ दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ची कामगिरी ; एक्स पॅड डिव्हाइसच्या मदतीने तयार केली डुप्लीकेट चावी ◆
लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
एक्स पॅड डिव्हाइसच्या मदतीने डुप्लीकेट चावी तयार करुन फोरव्हिलर चोरी करणाऱ्या आग्रा दिल्लीतील टोळीला व त्यांना पुण्यामध्ये चोरीला मदत करणाऱ्या एकास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ने जेरबंद केले असून त्यांच्याकडून वाघोली येथील कटकेवाडी परिसरातून डुप्लीकेट चावी तयार करुन चोरून नेलेली फॉर्च्युनर कार तसेच गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरून नेलेली इनोव्हा क्रिस्टा चे गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरून नेलेल्या दोन्ही कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
वाघोलीतील कटकेवाडी परिसरात शेल पेट्रोलपंपाच्या शेजारी व्यावसायिक अमोल तुपे यांची फॉर्च्युनर कार चोरून नेल्याची घटना २९ जुलै रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करीत होते. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने अथक परिश्रम घेत फॉर्च्युनर चोरीच्या गुन्ह्यामध्ये मनोज महेंद्र परिहार, राजेश राधेश्याम पंडित, इस्माईल शेफरखान (सर्व रा. आग्रा, दिल्ली) या तिघांना चोरीस गेलेली कारसह ताब्यात घेतले. त्यांना शहरामध्ये वाहन चोरी करण्यास मदत करणाऱ्या गोरक्षनाथ साहेबराव साळवे (रा. काळेवाडी फाटा) याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या टोळीने एक्स पॅड डिव्हाइसच्या मदतीने डुप्लीकेट चावी तयार करुन कारची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेले तिघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर नोएडा येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर त्यांना मदत करणारा पुण्यातील सराईत गुन्हेगार गोरक्षनाथ साळवे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून लोणीकंद आणि गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.

गुन्ह्यातील कार, तीन डोंगल, दीड लाख रुपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक्स चावी तयार करण्याचे पॅड, तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. एक्स पॅड डिव्हाईसच्या साह्याने की प्रोग्रॅम चोरून जागीच डूप्लीकेट चावी तयार करून वाहन चोरी टोळीतील सदस्य करत होते.
सदरची उल्लेखनीय कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस अंमलदार उदय काळभोर, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, दत्ता खरपुडे, शिवाजी जाधव, सुदेश सपकाळ, गणेश लोखंडे, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, अमोल सरतापे, संदिप येळे, विनायक येवले यांनी केली.





