हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोरच्या ग्रामीण भागातील जनतेची आरोग्यविषयक सेवा सुदृढ व्हावी व नागरिकांना प्राथमिक उपचार वेळेत व्हावे, आर्थिक कुचंबणा होऊ नये व जनमाणसांचे आरोग्य स्थिर असावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे माध्यमातून वेळवंड खोऱ्यातील बसरापूर, बारे, म्हाळवडी, पसुरे, राजघर, वेळवंड, निवंगणी, नांदघुर, जयतपाड, गायमाळ, नानावळे, कोंडगाव, डेहेन, सांगवी, सोनारवाडी, साळुंगण यांसह महुडे विभाग, हिर्डोशी खोऱ्यातील दुर्गम भागातील गावे, विसगाव खोऱ्यातील गावे अशी मिळून तब्बल ३८ खेडोपाडी एक गाव एक प्रथमोपचार पेटी वाटप करण्यात आल्या.

या पेटी मध्ये पोटदुखी, अंगदुखी, जळजळ, मळमळ, ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब इत्यादी आजारावर गुणकारी असलेली आयुर्वेदिक औषधे असून कापले, भाजले यासाठी मलम, बँडेज पट्टी आदी उपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदरील गावातील एक व्यक्ती आरोग्य रक्षक म्हणून निवड करून त्यांना अधिकृत डॉक्टरांकडून प्रशिक्षण देण्यात आले असून ते गावातील नागरिकाना प्रथमोपचार पेटी मधील औषध वितरण करणार आहेत, संपूर्ण सुविधा विनामुल्य असून येथून पुढे देखील औषधे ही जनकल्याण समितीचे माध्यमातून मोफत कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहेत. या सेवेचे ग्रामीण भागातील जनतेने स्वागत केले असून प्रथमोपचार पेटीतील औषधांनी फरक पडत असून नागरिकांची भोर ला येण्याची तसदी कमी झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

हा उपक्रम राबविण्यासाठी जनकल्याण समिती जिल्हाध्यक्ष प्रसाद गायकवाड, कार्यवाह संदीप देशपांडे, विराज सस्ते, अंकुश शिंदे, डॉ.समंता भोरडे, विठ्ठल तनपुरे, नागेश तनपुरे, माऊली बदक, किसन दिघे, संतोष कुमकर, आनंद सणस, मनोज धुमाळ व संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
आरोग्यविषयक अशी सुविधा गावोगाव उपलब्ध झाल्याने गोर गरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वेळेत उपचार मिळाल्याने त्यांच्या आरोग्याची हेळसांड होणार नाही यासाठी जनकल्याण समितीचे कार्य आदर्शवत आहे याचा निश्चितच सर्वसामान्यांना लाभ होईल.





