गजानन गव्हाणे पाटील
पुणे अहमदनगर महामार्गावर आपले घर सोसायटी ते जनक बाबा दर्गा या बीआरटी मार्गावर पीएमपीएमल च्या दोन बस समोरासमोर एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाला असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत.
या बाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, वाघोली आगारातील कात्रज ते वाघोली बस वाघोली कडे येत असताना नतावाडी आगारातील तळेगाव ढमढेरे ते मनपा या पुण्याकडे जाणाऱ्या बस एकमेकांवर बीआरटी थांबाच्या परिसरात समोरासमोर सकाळी ८.४५ च्या सुमारास धडकल्या. बस चा वेग जास्त असल्याने इलेक्ट्रिक बसचा पुढील भाग अक्षरशः समोरील बस मध्ये घुसल्याने अनेक प्रवाशांना गाडीच्या काचा फोडून बाहेर काढावे लागले. तर इलेक्ट्रिक वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र अतिवेगात सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या अशा वाहन चालकांवर कार्यवाही होणार का ? असा प्रश्न बस प्रवाशांकडून केला जात आहे. घटनास्थळी पीएमपीएमल चे अधिकारी आले आहेत.





