गजानन गव्हाणे पाटील
समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शिरूर शहरातील गंगावणे कुटुंबातील आदित्य कैलास गंगावणे याचे पुढील शिक्षण पुण्यामधील महाविद्यालयात व्हावे याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असुन मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील असे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.
समृध्दी महामार्गावरील अपघातात शिरुर येथील शिक्षक कैलास बबन गंगावणे, पत्नी कांचन कैलास गंगावणे व मुलगी डॉ. ऋतुजा कैलास गंगावणे हे मरण पावले होते.
कैलास गंगावणे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून ते शिक्षक झाले होते. सध्या ते शिक्षक म्हणून निरगुडसर, ता. आंबेगाव, जि .पुणे येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर कन्या डॉ. ऋतुजा यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. गंगावणे यांचे चिरंजीव आदित्य याच्या विधी शिक्षणासाठीचा प्रवेशाला ते नागपूरला गेले होते. त्यावेळेस त्याच्या समवेत पत्नी व कन्या ऋतुजा होत्या. आदित्य याला नागपूरला सोडून शिरुर येथे येण्यासाठी ते विदर्भ ट्रव्हल्सचा बसने प्रवास करीत असताना समृद्धी महामार्गावर पिंपरखुटा येथे बसचा अपघात झाला. त्यात बस गाडीची डीझेल टाकीचा स्फोट होवून आग लागली व या आगीत होरपळून प्रवाशी मृत्युमुखी पडले. त्यात गंगावणे परिवारातील या तीन जणांच्या ही मृत्यू झाला होता . या परिवारातील सदस्यांची भेट शिवसेनेचे नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुर येथे घेतली व गंगावणे कुटुंबियाचे सांत्वन केले .

भेटी नंतर बातमीदारांसमवेत बोलताना ते म्हणाले की झालेली ही घटना दुर्दैवी असुन अपघातात मृत्युमुखी पडलेली डॉ. ऋतुजा ही लांडेवाडी येथील शाळेची माजी विद्यार्थिनी होती. अपघातात आदित्य याचे आई वडिल व बहिण दगावले गेले आहेत. आदित्य यास एकट्याने नागपूरला जावून शिक्षण घेणे मानसिक दृष्ट्या चांगले राहिल असे वाटत नाही त्याच बरोबर अभ्यासात लक्ष लागेल अस वाटत नाही. त्यामुळे त्याचे ॲडमिशन पुणे परिसरात करण्याबाबत शासनाने पुढाकार घ्यावा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना भेटुन निवेदन देणार असुन मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेतली असा विश्वास आढळराव यांनी व्यक्त केला.
यावेळी आढळराव यांच्या समवेत तालुकाप्रमुख पै. रामभाउ सासवडे, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, तालुका संघटक संतोष गव्हाणे, शहर प्रमुख मयूर थोरात, उपशहरप्रमुख गणेश गिरे, भरत जोशी, शुभम माळी, सुरेश गाडेकर आदी उपस्थित होते.





