गजानन गव्हाणे पाटील
श्रीक्षेत्र तुळापूर,ता. हवेली येथे पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती, श्री क्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३४ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त मंगळवारी (दि. २१) शासकीय पूजा व मानवंदनेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपसरपंच राजाराम शिवले यांनी दिली.

सकाळी छत्रपती संभाजी राजेंचा पूजाभिषेक, त्यानंतर मूकपद यात्रा होईल. सकाळी नऊ वाजता साखळ दंडांचे पूजन व लातूर येथील शाहीर संतोष साळुंखे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होईल तर शिवव्याख्यात्यांचे शिवव्याख्यान होईल. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता पोलीस दलाकडून शासकीय मानवंदना देण्यात येईल.

सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र पुरंदर ते श्री क्षेत्र तुळापूर या श्री संभाजी महाराज पालखीचे आगमन व स्वागत होईल व दुपारी एक वाजता सर्व शंभू भक्तांच्या उपस्थितीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून मानवंदना देण्यात येईल. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिरास सुरुवात होईल.





