हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील इयत्ता दहावीच्या २ हजार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मोफत रायटींग पॅडचे वाटप करण्यात आले. भोरमधील संगणकाच्या एम एस सी आय टी कोर्सचे अधिकृत प्रशिक्षण देणारी संस्था रोबोकॉब कॉम्प्युटर्स, टिटेघर (ता.भोर) येथील ध्रुव प्रतिष्ठान आणि शहरातील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ या संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील २२ विद्यालयातील १ हजार २०० आणि भोर शहरामधील पाच विद्यालयातील ८०० विद्यार्थ्यांना रायटींग पॅडचे वितरण करण्यात आले. भोर शहरातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी रोबोकॉ़ब कॉम्प्युटर्सचे संचालक प्रा. विजय जाधव, ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर, फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, डॉ़. सुरेश गोरेगावकर, मुख्याध्यापक बाळासाहेब वाघ, सुपरवायझर सुनिल थोपटे, व्यवसायीक अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा. रवींद्र भालेराव, प्रा. रवींद्र दळवी, गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापीका उषा कदम, बाळासाहेब ताडे आदीं प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (दहावीच्या बोर्डाच्या) परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रीकेत नीटनेटकेपणा यासाठी तीन संस्थांनी हा उपक्रम राबविला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संतोष घोरपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ग्रामीण भागातील या उपक्रमाचा शुभारंभ नेरे (ता.भोर) येथील पंचक्रोशी आदर्श विद्यालयात करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापीका सुजाता भालेराव यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. शहर आणि तालुक्यातील इतर सर्व शाळांमध्ये जाऊन रायटींग पॅडचे वितरण करण्यात आले.





