गजानन गव्हाणे पाटील
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमी नंतर इयत्ता बारावीचे विद्यार्थी प्रथमच बोर्ड परीक्षेला सामोरे जात आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावर नकळत आलेला ताण, दडपण कमी करण्यासाठी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येरवडा येथील गेनबा सोपानराव मोझे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रशाला या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन आणि पेढे भरवुन स्वागत करण्यात आले.
गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, शाळा समिती अध्यक्ष अलका पाटील, सदस्य संजय मोझे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुनील खांदवे, प्रशालेचे प्राचार्य जालिंदर भागवत, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख सतीश सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक लक्ष्मण यादव, पर्यवेक्षक मारुती दसगुडे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

“जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावरील या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी व यशस्वी व्हावे “अशा शुभेच्छा याप्रसंगी रामभाऊ मोझे यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.





