हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
मोरगाव (ता.बारामती) येथील खाजगी क्लासेस मधील ३४ विद्यार्थी आणि शिक्षक रायगड या ठिकाणी सहली साठी निघाले होते. मांढरदेव काळूबाईचे दर्शन घेतल्यानंतर अंबाडखिंड घाटातून भोर मार्गे रायगड ला निघाले असता भोर येथील चौपाटी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वळताना बस चा ब्रेक अचानक निकामी झाला.
ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत हँडब्रेक लावून धाडस वृत्ती दाखवत बस मधून खाली उडी घेतली व नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या मदतीने चाकासमोर दगड टाकून बस थांबविली त्यामुळे होणारा पुढील अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

घटनेची माहिती समजताच भोर पोलीस स्टेशन चे पोलीस सुनील चव्हाण व शौकत शेख यांनी त्वरित घटनास्थळी पोहचून बस चालक व विद्यार्थ्यांना धीर देत रस्त्यावर झालेली वाहतूक बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.





