गजानन गव्हाणे पाटील
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद (पुणे), जिल्हा क्रीडा अधिकारी (पुणे) व बारामती कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती क्रीडा संकुल येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभाग स्तरावरील कराटे स्पर्धेत शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची राज्य स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यांनी “आपली लोकशाही” शी बोलताना सांगितले.
या विभागीय स्पर्धेसाठी पुणे शहर, ग्रामीण, पिंपरी चिंचवड, सोलापूर शहर व ग्रामीण तसेच अहमदनगर शहर व ग्रामीण भागातील १४, १७, १९ या वयोगटातील तब्बल ५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये कोरेगाव भीमा मधील व सध्या शरदचंद्रजी पवार विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ओंकार विकास गव्हाणे व क्रांती राजेंद्र पोटफोडे यांची राज्य स्तरावर निवड झाली. या स्पर्धकांना क्रीडा शिक्षक रामचंद्र शिवले व इतरांनी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब भंडारे, सचिव लक्ष्मण भंडारे, कोरेगाव भीमाचे सरपंच विक्रम गव्हाणे, उपसरपंच शिल्पा फडतरे आदींनी या स्पर्धकांचे मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





