वाहतूक कोंडीला अडथळा ठरणारे अतिक्रमणे हटविले जाणार
वाघोली : प्रतिनिधी
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतुकीशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांतील अधिकाऱ्यांच्या समन्वयाने बनविलेल्या समितीने वाघोली येथे कटकेवाडी ते खांदवेनगर भागामध्ये नुकतीच पाहणी केली. समिती गठीत झाल्यानंतर पुणे-नगर महामार्गापासूनच सर्वेक्षणास सुरुवात झाली असून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या अडथळ्याची माहिती घेऊन रस्ता रुंदीकरण, सिग्नल बसविणे, पदपथावरील अतिक्रमण काढणे व इतर उपाययोजना केल्या जाणार आहेत.

शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंगळवारी (दि. ३१ जानेवारी) वाहतुकीशी संबंधित सर्व यंत्रणांची एक समिती गठित केली आहे. त्या समितीकडून पहिल्या टप्प्यात अती वाहतुकीच्या १५ मार्गांचे सर्वेक्षण वाहतूक पोलीस, महापालिका, पीएमपीएमएल, पीएमआरडीए, महामेट्रो, आरटीओ व इतर विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर गर्दीच्या मार्गांवरील कोंडी सोडविण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत याबाबत सविस्तर अभ्यास करण्यात येईल. रस्त्यांवरील बस थांबे, सिग्नल, पदपथ याबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे. वाहतूक कोंडीची कारणे शोधून उपाययोजना करण्यात येणार आहेत. शहरातील गर्दीच्या रस्त्यांची पाहणी करून वाहतूक कोंडीचे कारण तसेच उपाययोजना केल्या जाणार आहेत. या समितीतील अधिकारी समन्वय साधून एकत्रित काम करणार आहेत.
वाहतुकी कोंडी सोडवण्यासाठी गठीत झालेल्या समितीने वाघोली येथून सुरुवात केली असून वाघोलीमध्ये कटकेवाडी ते खांदवेनगर भागामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबी तसेच महापालिका, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक बाबींची माहिती घेण्यात आली. महापालिकेच्या मदतीने पदपथावरील अतिक्रमण काढणे तसेच प्रत्येक चौकात सिग्नल बसविणे, वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे इतर आवश्यक उपाययोजना करण्याचे ठरविण्यात लवकरच यासंबंधित उपाययोजना केल्या जाणार आहेत.

यावेळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माधव जगताप, व्ही. जी. कुलकर्णी, सोमनाथ बनकर, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत सांगळे, लोणीकंद वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जयंत पाटील व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





