हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
पतीच्या निधनानंतर महिलांना दिली जाणारी वागणूक म्हणजे विधवा प्रथा आजही सूरू आहे. या प्रथेनुसार पतीच्या निधनानंतर स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढलं जातं, कपाळावरचं कुंकू पुसलं जातं, पायातील जोडवी, हातातील बांगड्या तसंच अंगावरील दागिने काढले जातात. पतीच्या निधनानंतर महिलेचं आयुष्य एकाकी करण्याच्या या प्रथेमुळे विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होता येत नाही. कोणत्याही शुभ कार्यात विधवा महिलांना हीन वागणूक दिली जाते. याच प्रथेच्या विरोधात आवाज उठवत अशा महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी उन्नती महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सीमा तनपुरे यांनी गंगाभागिरथी (विधवा) महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभ प्रसंगी सांगितले.
भोर मधील उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांच्या संकल्पनातून मकर संक्रांतीनिमित्त भोर शहर व ग्रामीण भागातील गंगाभागिरथी (विधवा) महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तनपुरे बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की अशा महिलांना विधवा नावाने न संबोधता येथून पुढे त्यांना “गंगाभागिरथी” या नावाने संबोधले जावे.
या हळदी कुंकू समारंभात विधवा महिलांना हळदीकुंकू लावून संक्रांतीचे वाण म्हणून निरंजन देण्यात आले. तसेच तिळगुळ वाटून आनंद साजरा केला. महिलांनी मनोगत व्यक्त करताना केलेल्या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले. तर विधवा महिलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार असून त्यांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी उन्नती महिला प्रतिष्ठान पुढाकार घेणार आहे.

यावेळी उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे, भाग्यश्री वरटे, स्मिता सुर्वे, वैशाली बांदल, अश्विनी धोडे, सुषमा कंक, सध्या झगडे, मनिषा पडवळ सह गंगाभागिरथी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





