निरगुडसर : प्रतिनिधी
निरगुडसर ता. आंबेगाव येथे दोन ते तीन दिवसापासून फिरत असलेल्या मनोरुग्ण व्यक्तीस निरगुडसर येथील पोलीस पाटील व तरुणांनी त्याची माहिती काढत पोलिसांच्या सहकार्याने त्याला सुरक्षित कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या तीन चार दिवसापासून निरगुडसर परिसरात एक मनोरुग्ण फिरत होता. थंडीचे दिवस असल्याने हा मनोरुग्ण रात्रीच्या वेळी अनेकांच्या घरासमोर दरवाजा वाजवून मदत मागत होता. मात्र त्यावेळी गावातील काही लोकांनी चोर समजुन त्याला मारहाणही केली होती. याबाबत दि. ९ रोजी गावचे पोलीस पाटील विठ्ठल वळसे यांना माहिती कळली असता त्यांनी याबाबत माहिती घेत याबाबत दीदी लुसी कुरियन यांच्या माहेर संस्थेत काम करणारे राहुल दांगट यांना संपर्क केला त्यावेळी राहुल दांगट व पोलीस पाटील यांनी त्या व्यक्तीस चहा नाष्टा चारून त्याला पारगाव पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.

त्या ठिकाणी पारगाव पोलीस ठाण्याचे स. पो. नि. लहू थाटे, पो. ह. किरवे, पोलीस पाटील विठ्ठल वळसे, राहुल दांगट यांनी धीर देत त्याची चौकशी केली. चौकशीत त्याच्या मुलाचा नंबर मिळाल्यावर त्यावर संपर्क केला असता सदर व्यक्तीचे नाव सोपीया मंडल असून ते मूळचे कलकत्ता येथील असल्याचे समजले तीन महिन्यापूर्वी ते घोडेगाव या ठिकाणी सेंट्रींग कामासाठी आले असल्याचे समजले. त्यानंतर मोबाईल संपर्क करून घोडेगाव येथील सदर व्यक्तीच्या चुलत भाऊ राजू मंडल यांना संपर्क करून सर्व खात्री करून सदर व्यक्तिस निरगुडसर येथील राहुल दांगट, वैभव किरे, नितिन खिलारी यांनी गाडीची व्यवस्था करून नाश्ता, कपडे देऊन सुखरुप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.





