हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी केलेल्या अतुलनीय कार्यात भोर तालुक्यातील निष्ठावान मावळ्यांचे योगदान महत्वपूर्ण असून नव्या पिढीने त्यांचे कार्य विचारात घेऊन व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक व छत्रपती संभाजी महाराज मालिकेचे सल्लागार दत्ताजी नलावडे यांनी व्यक्त केले.
भोर एज्युकेशन सोसायटीच्या बारे बुद्रुक येथील माध्यमिक विद्यालयाच्या स्नेह संमेलनातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात पुरस्कार देताना ते बोलत होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व त्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन बांधकाम व्यवसायिक विनोद दानवले यांच्या हस्ते संपन्न झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी भोर एज्युकेशन सोसायटीच्या शालेय शाळा समितीचे सदस्य डॉ .सचिन पाटील हे उपस्थित होते.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ज्ञानोबा दानवले, आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष धर्माजी दानवले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष दानवले, पुणे जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक विठ्ठल दानवले, अंगणवाडी शिक्षिका सुजाता वीर, बारे विद्यालयाच्या मुख्याध्यापक बी वाय सापे, शिक्षकेतर प्रतिनिधी विजय दानवले, राजू गाडेकर, व्हि एल गायकवाड, के जे शिंदे, अभिषेक दानवले, आकांक्षा दानवले, बाळासाहेब दानवले आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे म्हणाले की, जगातील पहिल्या लोकशाहीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी भोर तालुक्यातील रायरेश्वर येथे प्राचीन शंभू महादेवाच्या साक्षीने केली. तालुक्यातील मावळ्यांचे योगदान व अनमोल कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे. पुढच्या पिढीने शैक्षणिक प्रगती करत आपल्या छत्रपतींच्या इतिहासाचे देखील अभ्यास करून त्यांची प्रशासनातील राज्य कारभाराची आदर्श पद्धत समजून घेऊन आपल्या जीवनात त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश शिंदे यांनी केले . सूत्रसंचालन मुख्याध्यापक बि वाय सापे यांनी केले तर आभार वसंत गायकवाड सर यांनी मानले .





