निगुडघर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
भोर तालुक्यातील महाड – पंढरपुर मार्गावरील आपटी – निगुडघर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना रस्त्यावर खड्डे की स्वड्ड्यात हेच कळेना झाले आहे त्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांनमुळे दुचाकी, चार चाकी वाहनचालक ञस्त झाले आहेत.

महाड- पंढरपूर मार्गावरील भोर – वरंधा घाट मार्गे महाडला जोडणारा वाहतुकीसाठी जवळचा रस्ता आहे. निरा – देवघर धरणही याच मार्गावर असल्यामुळे पर्यटकाची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते, मात्र आपटी – निगुडघर रस्त्याची दुरावस्था झाली असुन रस्त्यावर अर्धा फुटापर्यत मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमधून वाहनचालवताना वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत तर प्रवाशांचे कंबरडे मोडत आहे यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना अडचणी येत आहेत तर वाहन चालवताना रस्त्यातील खड्ड्यांमध्ये गाडी आपटुन अपघात होत असल्याने अपघाता मध्ये वाढ झालेली आहे. या रस्त्यावरील खड्डे कोणी भरेल का असा प्रश्न वाहन चालकांकडून उपस्थित होत आहे





