दौंड : प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात नाव लौकिक असणाऱ्या व देव-दानव युद्धासाठी प्रसिद्ध असलेल्या कुसेगाव, ता.दौंड येथील ग्रामदैवत श्री भानोबा देवाच्या यात्रेला दोन दिवसीय सांस्कृतिक कलेचा तमाशा ठरवत यात्रेच्या जोरदार तयारीची पहिली ठिणगी पडली असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद निर्माण झाला आहे..
कुसेगाव, ता.दौंड येथील भानोबा देवाची यात्रा मोठी असल्याने सुमारे पाच ते सहा लाख भाविक यात्रेसाठी येत असल्याने यात्रा एक महिन्यावर आल्याने गावच्या तयारीसाठी सुमारे पंचवीस दिवस लागत असल्याने या तयारीच्या नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जेष्ठ विजयसिंह शितोळे, दादासाहेब शितोळे, उद्योजक मोहन शितोळे, मणेश शितोळे, माजी उपसरपंच डॉ. अमोल शितोळे, तंटामुक्ती अध्यक्ष शरद शितोळे, शिवाजी शितोळे, ईश्वर शितोळे, मधूकर शितोळे, विनोद शितोळे, निलेश शितोळे भानोबा तरुण मंडळ उपस्थित होते.

या बैठकीत दरवर्षी प्रमाणे असणारा तमाशा रद्द करून नवी तमाशा ठेवण्याचा आग्रह गावाचा असल्याने वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंगळे यांचा सांस्कृतिक कलेचा दोन दिवसीय लोकनाट्य तमाशा ठरवण्यात आला आहे. तर गावाला नेहमीप्रमाणे आकर्षित करण्यात येणारी विद्युत लाईट, गावातील स्वच्छता, रस्ते, पाणी पुरवठा, देव-दानव युद्धासाठी मैदान व्यवस्था, मंडप, कुस्त्यांचा आखाडा अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.





